Pune Crime : गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस दलात खळबळ





Google Office : पुण्यातील (Pune News) गुगलचे ऑफिस (Google office) बॉम्बने (bomb threat) उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात कोरेगाव पार्क येथे बॉम्ब असल्याचा फोन मुंबईतील (Mumbai) गुगलच्या (google) कार्यालयात आला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकाराची बॉम्ब सदृश्य वस्तू मिळाली नाही. पोलिसांनी या प्रकरणी एकाला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर घबराट पसरली होती.

पुण्यातील मुंढवा परिसरातील पुनावाला इमारतीमध्ये शेवटच्या मजल्यावर गुगलचे ऑफिस आहे. दोन महिन्यांपूर्वीच हे ऑफिस सुरु करण्यात आले होते. मुंबईतल्या गुगलच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन करुन पुण्यातील गुगलच्या ऑफिसखाली बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. मुंबईच्या गुगल ऑफिसने पुणे पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुंढवा पोलिसांनी तात्काळ गुगलच्या इमारतीमध्ये जाऊन तपास सुरु केला. मात्र तपासामध्ये कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धमकीचा फोन आल्यांतर मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास करत हैद्राबाद येथून एकाला अटक केली आहे. बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी शिवानंदविरोधात 505 (1) (ब) व 506 (2) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिवानंदने मुंबईच्या गुगल ऑफिसमध्ये फोन करत पुणे गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. मात्र पोलीस तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी शिवानंद याला हैद्राबाद येथून अटक केली आहे.

मुंबई पोलीस दलातील सह पोलिस आयुक्तांना आलेल्या एका फोनने मुंबई पोलिसांची झोप उडवली आहे. सह पोलीस आयुक्तांना सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास एक निनावी नंबरवरुन फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने स्वत:चे नाव यशवंत माने सांगत मिरा-भाईदर मध्ये बॉम्ब स्फोट होणार असल्याची माहिती दिली. तसेच तात्काळ तिथे पोलीस पाठवा असे सांगितले.

सह पोलीस आयुक्तांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शिवीगाळ केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सह आयुक्तांनी याबाबत मुख्य नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. मुख्य नियंत्रण कक्षाकडून याबाबतची माहिती मिरा भाईंदर येथील पोलीस नियंत्रण कक्षाला दिली असून पोलिस अधित तपास करत आहेत.

Comments