Most Polluted City: मुंबईकरांचा जीव धोक्यात? श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत, काय आहे कारण?





Mumbai Second Most Polluted City in World​ : मुंबईकरांचा जीव धोक्यात आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. Swiss Air Tracking Index IQAir ने 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यानची आकडेवारी जाहीर केली आहे. ही संस्था रिअल-टाइममध्ये जगभरातील हवेची गुणवत्ता तपासत असते. 13 फेब्रुवारीला मुंबई भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं होतं. 

नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता. गेल्या चार वर्षातल्या सर्वात जास्त प्रदूषणाची नोंद या काळात झाली होती. हवेची गुणवत्ता खालवत असल्यानं मुंबईकरांचा श्वास गुदमरत असून श्वसनाच्या आजाराच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. 

IQAir ने UNEP आणि Greenpiece सह संयुक्तपणे काम करत असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) कडील डेटा वापरून भारतातील हवेची गुणवत्ता मोजते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसारही, मागील हिवाळ्यांच्या तुलनेत यावेळी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात हवेची गुणवत्ता फार वाईट होती. अनेक ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामांमुळे उडणारी धूल आणि वाहनांच्या उत्सर्जनाचा शहरातील प्रदूषणात मोठा वाटा आहे. 

NEERI आणि IIT-B च्या 2020 च्या संशोधनानुसार, मुंबईच्या हवेतील 71% पेक्षा जास्त प्रदूषणासाठी रस्ते किंवा बांधकामातून उडणारी धूळ आहे. उर्वरित प्रदूषण कारखाने, वीजनिर्मती केंद्र, विमानतळ आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांद्वारे निर्माण होते.

पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात असामान्य घट झालेल्या ला निना इफेक्टने (The La Nina effect) पश्चिम किनार्‍यावरील वाऱ्याचा वेग कमी केला आहे, ज्यामुळे प्रदूषकांचा प्रसार मर्यादित होण्यास मदत झाली आहे.

Comments